सोबत आणि संगत
सोबत आणि संगत हे समानार्थी शब्द आहेत पण व्यवहारात वापरतांना भरपूर वेळेस हे विरुद्धार्थी वापरले जातात. सांगायचे झाले तर "तुझी सोबत चांगली आहे" आणि "तुझी संगत वाईट आहे".समानार्थी शब्द असूनपण इतका विरोधाभास का?
सोबत हा शब्द जेव्हा काही चांगले आणि संगत हा शब्द जेव्हा काही वाईट दर्शवायचे असले की वापरतात."तुझी सोबत चांगली आहे म्हणून तुझी प्रगती झाली आहे" आणि "तुझी संगत वाईट आहे म्हणून तुझी अधोगती चालू आहे" ही वाक्य आपण जीवनात कधी ना कधी ऐकतोच.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सोबत ही असतेच ती मग एखाद्या व्यक्तीच्या, आठवणीच्या, किंवा वस्तूच्या स्वरुपात असते. सोबत म्हणजे जिचा आपल्या जीवनात असल्याने किंवा नसल्याने फरक पडतो असे स्वरुप.
व्यक्तींची सोबत सांगायची झाली तर आईवडिलांची सोबत, नवरा बायकोची सोबत, प्रियकर प्रियसीची सोबत, मित्र मैत्रिणीची सोबत ह्या सगळ्या सोबती आपल्याकडे असतात आणि हव्याहव्याशा वाटतात.
ह्या सोबतीमुळे आपल्या आयुष्यात दररोज नवनविन रूपामध्ये जगण्याचा रस भरत असतो. जसेकी आपल्या दारापुढे दररोज सकाळी नविन रांगोळी काढली जाते आणि त्यामध्ये रंग भरले जातात आणि त्या रांगोळीला अजूनही सुरेख करतात त्याचप्रमाणे ह्या व्यक्तींसोबत आपले जीवन पण रंगीन आणि सुरेख बनत असते.
एका व्यक्तीचा अपघात झाला आहे तिला दवाखान्यात आणले जाते आणि उपचार सुरू केले जातात पण त्याची तब्येत खूप खराब असते. त्याचे आईवडील, मित्र मैत्रिणी त्याच्या तब्येतीच्या काळजीने व्याकूळ असतात आणि डॉक्टर त्याचे जीवन वाचवण्यासाठी व्यस्त असतात.काही वेळानंतर डॉक्टरांच्या प्रत्यानांनी ती व्यक्ती वाचते पण डॉक्टर त्याला शुद्धीवर येण्यासाठी ४८ तास तरी लागतील असे सांगतात.
डॉक्टरानांनी दिलेले ४८ तास पण आता पूर्ण होऊन गेले आहेत आणि अजूनही ती व्यक्ती शुद्धीवर आली नाही आहे.त्याचे आईवडील, मित्र मैत्रिणी त्याच्या तब्येतीच्या काळजीने अजूनही व्याकूळ आहेत आणि ते प्रत्येक सेकंद, मिनिट डॉक्टरांना आणि देवाला त्याची तब्येतीत सुधारण्याची विनवणी करत असतात.
शेवटी त्याला शुद्ध येते आणि डोळे उघडतो त्याच्यासमोर त्याचे आईवडील, मित्र मैत्रिणी उभे असतात आणि हेच त्याचे सोबती असतात. तो क्षण अमुल्य आहे आणि तो त्याच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यांना बघून त्याच्या मनात उदगार येतात.
"तुमची सोबत असली की मला माझाही आधार लागत नाही,
तुम्ही फक्त सोबत रहा मी दुसरे काही मागत नाही".
आठवण ही पण एक सोबत आहे. आठवणीमध्ये आपण ज्या व्यक्तीसोबत वेळ घालवलेला असतो तो आपल्याला आनंद देत असतो. फोटो हे सर्वात उत्तम उदाहरण आहे आठवणी जतन करण्याचे. जेव्हापण आपण फोटो बघतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची आणि ते आनंदमयी क्षण आठवत असतात आणि जीवनात रंग भरत असतात.
"हे तुझे पावलांचे ठसे माझ्या ह्रदयावर उमटून गेले,
हेच पावलांचे ठसे नंतर आठवणीने गुंफून गेले".
वस्तू ही पण एक सोबत आहे. ह्यामध्ये गिफ्ट, एखादी जतन केलेली वस्तू, पुरस्कार असे काही जे बघून आपल्याला आनंद मिळत असतो.
मुलाने आईला घेतलेली पहिली साडी. आई जेव्हाकेव्हा ती साडी घालते त्या प्रत्येकक्षणी ती आनंदी होत असते आणि ती प्रत्येकाला सांगत असते की ही साडी माझ्या मुलाने मला घेतली आहे. ती साडी तिला आपला मुलगा आपल्यासोबत आणि आपल्यावर प्रेम करतो ह्याची साक्ष देत असते.
संगत पण तशी वाईट नसते तिला वाईट समजून, आठवून जीवनात दुःखाचे काटे रोवून ठेवू नका.वाईट काय आहे हेच कळले नाहीतर चांगले काय आहे हे कसे कळणार त्यामुळे संगतीला सोबतीचा आरसा समजून जगा. आयुष्यात दुःखच आले नाहीतर सुखाचे महत्त्व कसे कळणार तसेच वाईट मार्ग निवडला गेला आहे हे न कळल्याशिवाय चांगला मार्ग कसा निवडणार.
एक आणि एक मिळूनच दोन होतात असे आहे का? नाहीना तीन वजा एक पण दोन होतात ना तसेच वाईट संगतीला वजा करा आणि सोबतीच्या बरोबर आनंदाने राहा.
सोबत ही जतन करून ठेवा आणि सगळ्यांशी सोबत राहून आनंदाने आयुष्य जगा.
आशाकरतो की, मित्रांना आणि वाचकांना हा लेख आवडला असेल.
लवकरच भेटूया, नविन विषय आणि विचारांसोबत.......
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा