सुख की समाधान
विचार केला की ह्या प्रश्नांना कागदावर उतरवून बघू आपल्या शब्दांत काही उत्तर किंवा मार्ग मिळतो का?
सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपण मनापासून जी ईच्छा,अपेक्षा निर्माण करतो आणि एकेदिवशी आपल्या प्रयत्नांनी पूर्ण होते त्यावेळेस आपल्या मनातून आवाज येतो अरे व्हा आता मला सुख मिळाले किंवा मी सुखी झालो.
आपण त्या सुखासोबत काही दिवस,महिने आणि वर्ष जगत असतो.पण अचानक एकेदिवशी एखाद्या वादळाप्रमाणे परत आपल्या मनात एक नविन ईच्छा,अपेक्षा शिरकाव करते आणि आपले सुख हिरावून घेते.आपण नविन जोमाने प्रयत्न करून सुख परत मिळतो.हे चक्र चालूच राहते कारण आपल्या ईच्छा आणि अपेक्षा कधी संपत नाही.ह्या सर्व चक्रव्यूहात आपण स्वतःला अडकवून घेतो आणि स्वतःला हरवून बसतो.
आता हे तर कळले पण स्वतःला शोधायचे कसे? ह्या प्रश्नाचे पूर्ण नाही पण मी थोड्याप्रमाणात उत्तर शोधण्याच्या प्रयत्न केला आहे.
सुखाच्या मागे लागण्याऐवजी समाधान मानने कधी सोपे आहे.कारण सुख मिळवावे लागते आणि समाधान मानावे लागते. सुख शोधावे लागते पण समाधान आपल्याजवळ असते. त्यामुळे सुख शोधण्यासाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा समाधान मानने कधी चांगले. सुखासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात पण समाधानासाठी फक्त अंतरमनातून प्रयत्न करावे लागतात. सुख निर्मित करावे लागते आणि समाधान जागृत करावे लागते. असेही समाधान हे आपल्याजवळच असते त्यामुळे ते जागृत करणे पण सोपे असते.
सुखाच्या शोधात वेळ वाया घालवू नका,म्हणतात ना गेलेली वेळ परत येत नाही,सगळे विकत घेता येते पण वेळ नाही.आजच्या जगामध्ये आयुष्य हे खूप कमी झाले आहे त्याला सुख शोधण्यासाठी अजून कमी करू नका.सुखाच्या नांदामध्ये दोन घास कमी होतील आणि समाधाने दोन घास जास्त जातील. सुखाच्या मागे निराशा येते पण समाधानाच्या मागे आशा येते. तिच आशा ही अमूल्य जीवन आनंदाने जगण्याचा प्रकाश देते.सुखाच्या अंधारात राहण्यापेक्षा समाधानाच्या प्रकाशात जगा.
अजून असेही वाटते की,सुखाच्या मागे लागण्यास काही प्रमाणात आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा पण थोडाफार समावेश आहे.ते पण आपल्याला "सदा सुखी रहा" हाच आशिर्वाद देत असतात आणि आपल्या मनात सुखी राहण्याचे बिज रुजवत जातात त्यांच्यासोबतच समाज,नातेवाईक आणि इतर हे त्याला पाणी घालून अंकुरीत करतात आपण ही त्यासोबत ह्या सुखी रुपी विश्वात सुखाच्या पानांसोबत एखाद्या निरपेक्ष झाडाप्रमाणे तयार होत असतो.
आपण घ्या सुखीरुपी पानांना सोडूया आणि नविन समाधानरुपी पाने फुलवून समाधानरुपी टवटवीत वृक्ष म्हणून जगू या.
"सुखाला नकार समाधानाला होकार"
आशाकरतो की, मित्रांना आणि वाचकांना हा लेख आवडला असेल.
लवकरच भेटूया, नविन विषय आणि विचारांसोबत.......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा